७ मे २०२६
संसार टिकवण्यासाठी भावाने आईच्या नावावर असलेली जमीन विकली, २१ तोळे सोनं आणि २५ लाख रुपये सासरच्यांच्या पदरात टाकले... पण पैशांची हाव काही संपली नाही. नाशिकच्या जेलरोड परिसरात एका विवाहितेने सासरच्या अमानुष छळाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे अनैतिक संबंध आणि जादूटोण्याची धमकी यांमुळे हतबल झालेल्या 'आशा' नावाच्या माऊलीची अखेर सासरच्या छळामुळे आयुष्याची निराशा झाली आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
आशा प्रवीण घोटेकर असं मृत विवाहितेचं नाव आहे. आशा यांचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ सुरू झाला होता. फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांकडून वारंवार २५ लाख रुपयांची मागणी केली जात होती, असा आरोप आशा यांच्या भावाने केला आहे. बहिणीचे संसार टिकावे या उद्देशाने भावाने चक्क आईच्या नावावर असलेली जमीन विकून सासरच्यांना पैसे दिले होते. मात्र, पैशांची हाव संपली नाही आणि छळ सुरूच राहिला.
अनैतिक संबंध आणि जादूटोण्याची
धमकी विवाहितेच्या भावाने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपी पतीचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, आशा यांना केवळ मारहाणच नाही तर "तुझ्यावर जादूटोणा करून तुला मारून टाकू," अशी अघोरी धमकीही सासरच्या मंडळींकडून दिली जात होती. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर आशा यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
२१ तोळे सोनं आणि अमानुष छळ
तक्रारीनुसार, आतापर्यंत सासरच्यांनी विवाहितेच्या माहेरून २५ लाख रुपये आणि सुमारे २१ तोळे सोने उकळले होते. एवढे देऊनही सासरच्यांची मागणी कमी होत नव्हती. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आशा घोटेकर या प्रचंड तणावाखाली होत्या. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी मृत विवाहितेचा पती आणि अन्य एका नातेवाईकाला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. नाशिकमध्ये अशाप्रकारे विवाहितेनं जीवन संपवल्याने हुंडाबळीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा अधिक तपास नाशिक उपनगर पोलीस करत आहेत.
Copyright ©2026 Bhramar