आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून शुल्लक कारणांवरून काही विकृत अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे सर्रासपणे करत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत चकाका एक तरुणाने एका तरुणीला फरफटत नेत थेट धरणा ढकलले. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
पुणे-नाशिक महामार्गालगत भरसायंकाळी एक अंगावर काटा आणणारा थरार घडला आहे. एका माथेफिरू तरुणाने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या तरुणीला जबरदस्तीने ओढत नेऊन थेट धरणाच्या उजव्या कालव्यात ढकलून दिले. एवढ्यावरच न थांबता त्या तरुणाने स्वतःही तिच्या पाठीमागे कालव्यात उडी घेतली. स्थानिक तरुणांनी प्राणाची बाजी लावून पाण्यातून बाहेर काढले तेव्हा त्या तरुणाने चक्क दगडफेक करत पोलिसांनाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत २० वर्षीय निष्पाप तरुणी पात्रात वाहून गेली असून संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही थरारक घटना मंचर बाह्य वळणाजवळ रविवार (ता. १४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. पीडित तरुणी स्वप्नाली पोपट भांगरे (वय २०, सध्या रा. मंचर) ही निघोटवाडी हद्दीतील एका बांधकाम स्थळावर काम करते. रविवारी सायंकाळी काम आटोपल्यानंतर ती नेहमीप्रमाणे पुणे-नाशिक महामार्गालगत पायी घरी जात होती.
फरफटत ओढत नेले अन् कालव्यात फेकले
स्वप्नाली पायी जात असतानाच तिथे अचानक रमेश कडाळे नावाचा तरुण आला. त्याने काहीही विचार न करता स्वप्नालीला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला ओढत नेण्यास सुरुवात केली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र ताकदीच्या जोरावर त्याने तिला उजव्या कालव्यावरील पुलाजवळ नेले आणि थेट वेगवान पाण्याच्या प्रवाहात ढकलून दिले. त्यानंतर क्षणाचाही विचार न करता रमेशने स्वतःही कालव्यात उडी घेतली.
हा धक्कादायक प्रकार समोरून जाणारे निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत कुणाल निघोट, रोहित निघोट आणि समीर निघोट यांना मदतीसाठी बोलावले. या तिघांनीही आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या वेगवान प्रवाहात उड्या घेतल्या आणि आरोपी रमेश कडाळे याला सुखरूप बाहेर काढले. मात्र, बाहेर काढत असताना क्रूरतेची सीमा गाठलेल्या रमेशने वाचवणाऱ्या तरुणांवरच उलट विरोध करत दगडफेक सुरू केली. स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून थेट मंचर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या भयंकर घटनेत स्वप्नाली भांगरे ही तरुणी पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने रात्री उशिरापर्यंत बेपत्ता होती. स्थानिक तरुणांनी कालव्यात उतरून शोधमोहीम राबवली. अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्यानेही परिसराची पाहणी करण्यात आली, मात्र रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तिचा कोणताही सुगावा लागला नव्हता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने डिंभे धरणातून कालव्यात सोडलेले पाणी बंद करण्याची कडक पावले उचलली असून, शोधकार्यासाठी थेट 'एनडीआरएफ' (NDRF) च्या पथकाला पाचारण केले आहे. पोलिसांनी आरोपी रमेश कडाळे याला कसून चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याने हे भयंकर कृत्य नेमक्या कोणत्या कारणातून केले? याचे गूढ अद्याप कायम आहे.