नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- पाणी बॉटलचे पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकान मालकाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवाजी चौक परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी मारूती भाऊराव कड (वय 61, रा.जुने सिडको) यांचे शिवाजी चौक परिसरात एक दुकान आहे. हे दुकान साईबा अमृततुल्य नावाने असून, ते आरोपी नंदन पाईपराव याच्या सोबत चार ते पाच जण आले होते. त्यांनी दुकानातून पाण्याची बॉटल घेतल्याने तेथील कामगाराने पैसे मागितले.
असे बोलल्याचा राग आल्याने टोळक्यातील एकाने कामगाराला सांगितले की, तू मला ओळखत नाही का? मी नंदन पाईकराव आहे, तू माझ्याकडून पैसे मागतो. आम्ही अर्जुन पगारेची माणसे आहोत. तुझी एवढी हिंमत की, तू आमच्याकडे पैसे मागतो. आम्ही अर्जुन पगारेच्या नावाने परिसरात पैसे मागतो आणि तू आमच्याकडे पैसे मागतो. पुन्हा जर पैसे मागितले तर तुझे दुकान जाळून टाकेल, अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.
25 फेब्रुवारी रोजी दुकान मालक फड हे नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये सकाळी गेले असता तेथे नंदन पाईकराव, रोहण इंगळे व त्याचे चार ते पाच साथीदार आले. तूच दुकानाचा मालक आहे ना? तू काल आम्हाला शिव्या देत होता का?, असे म्हणत या टोक्याने फड यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तुझे दुकान जाळून तूला मारून टाकतो, अशी धमकी या टोळक्याने दिली. आम्ही पुन्हा येतो तुझ्याकडे तुला खूप माज आला आहे. तुझा माजच उतरवतो, असे पाईकराव फड यांना म्हणाला.
त्यानंतर या टोळक्याने हातात कोयते आणि लाकडी दांडके आणून फड यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले. नंतर त्यांनी फड यांच्या छातीवर दांडके मारत तूला जीवे मारतो, अशी धमकी दिली. त्यावेळी परिसरात नागरिकांनी गर्दी केल्याने हे टोळके तेथून निघून गेले. आमची या परिसरात दहशत आहे जर कोणी आमच्याकडे पैसे मागितले तर तुमचेपण हेच हाल होतील, असे म्हणून ते तेथून निघून गेले.
काही दिवस मुलीकडे उपचार केल्यानंतर फड यांनी या टोळक्याविरूद्ध अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलिसांनी नंदन पाईकराव, रोहण इंगळे, ऋषिकेश बेळे, विजय सदावर्ते व गणेश जाधव यांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागूल करीत आहेत.