नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिला मध्य प्रदेशात विकून तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आठ जणांना न्यायालयाने पोक्सोअंतर्गत दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, की फिर्यादी फुलेनगर येथील राहुलवाडी परिसरात राहतात. त्यांची अल्पवयीन पुतणी हिला आरोपी प्रियांका देवीदास पाटील ऊर्फ प्रियांका पानपाटील (रा. ओझर, ता. निफाड), रत्ना विक्रम कोळी (रा. श्रीरामनगर, ओझर), सुरेखाबाई जागो भिल (रा. गौरव वाईनशेजारी, शिरपूर), दिनेश सुखराम राठोड (रा. भातखेडी, ता. खाजरौद, मध्य प्रदेश), शरीफ भिकन शहा (फरारी), कैलास अंबासन मालविय (रा. रतलाम, मध्य प्रदेश), बद्रीलाल रतनलाल बलाई (रा. बागेडी, पो. ब्रजगाव, मध्य प्रदेश) व काजल सिद्धार्थ गायकवाड (रा. राहुलवाडी, पेठ रोड, पंचवटी) यांनी संगनमत करून अल्पवयीन मुलीला पळवून नेले. प्रथम या मुुलीला शिरपूर येथे नेले. तेथून या मुलीला मध्य प्रदेश येथे नेण्यात आले. त्यावेळी तेथे आरोपींच्या मार्फत या मुलीला दिनेश राठोड याला विकून त्याच्यासोबत या मुलीचा बालविवाह लावण्यात आला, तसेच राठोड याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपी काजल गायकवाड हिने पीडितेचा विवाह झाल्याची बातमी तिच्या पालकांपासून लपवून ठेवली होती. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा, तसेच पोक्सोअंतर्गत वरील आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी केला असून, त्यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी कोर्ट क्रमांक 6 च्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती पी. व्ही. घुले यांच्या कोर्टात झाली.
यावेळी घुले यांनी गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा व 2 लाख 95 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता सुप्रिया गोरे व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण यांनी कामकाज पाहिले. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर पिंगळे, पोलीस अंमलदार विक्रांत नागरे, राजश्री बोंबले यांनी पाठपुरावा केला.
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त मोनिका राऊत, शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पथकाचे अभिनंदन केले.