नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- आजच्या धावपळीच्या आणि महागाईच्या युगात जिथे माणूस पैशासाठी नाती विसरतो, तिथे नाशिकमध्ये माणुसकीचे दर्शन घडवणारी एक सुखद घटना समोर आली आहे.
रस्त्यावर पडलेली २ लाख ८२ हजार रुपयांची रोकड रिक्षाचालक आणि एका प्रवाशाने प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केली. नाशिकरोड पोलिसांनी तांत्रिक तपास करून अवघ्या काही तासांत ही रक्कम मूळ मालकाला सुपूर्त केली असून, या प्रामाणिकपणाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
शनिवारी (दि. २८) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास जेलरोड येथील चरणदास मार्केटसमोरील स्टेट बँकेबाहेर एका सफेद प्लास्टिक पिशवीत रोख रक्कम पडलेली होती. पिशवीतून नोटांचे दोन बंडल बाहेर डोकावत होते.
याच दरम्यान, रिक्षा चालक मयुर सुरेश निकम (रा. जेलरोड) हे प्रवासी भाऊसाहेब गवळे यांना घेऊन नांदूर नाक्याकडून बिटकोकडे जात होते. रस्त्यावर पडलेली पिशवी पाहताच दोघांनी रिक्षा थांबवली. पिशवी उचलल्यानंतर समोरून जाणाऱ्या एका कारमधून ही रक्कम पडली असावी, या संशयावरून त्यांनी त्या कारचा पाठलाग केला.
मात्र, कार चालकाने ती रक्कम आपली नसल्याचे सांगितले. परिसरात चौकशी करूनही मूळ मालक न मिळाल्याने निकम आणि गवळे यांनी वेळ न घालवता थेट नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्याकडे त्यांनी ती रक्कम सुपूर्द केली.
सीसीटीव्हीमुळे लागला छडा
काही वेळातच राजेंद्र माधवराव कुलथे (रा. जेलरोड) हे आपली रक्कम गहाळ झाल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी खात्री करण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांना तपासाच्या सूचना दिल्या.
पथकाने तातडीने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ती रक्कम कुलथे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने राजेंद्र कुलथे भावूक झाले. त्यांनी रिक्षाचालक व प्रवाशाचे आभार मानले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने या दोघांच्या प्रामाणिकतेचा गौरव करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.