बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज 94 वा नारळी सप्ताह पार पडत आहे, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेला प्रकार गंभीर असून सखोल चौकशी करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये एका आयटी कंपनीत बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, अशी एक भयानक 'मोडस ऑपरेंडी' येथे राबवली जात असल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, लैंगिक अत्याचारा 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटकही झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याप्रकरणी भाष्य केलं.
नाशिकमध्ये पोलिसांनी उघडकीला आणलेलं आयटी कंपनीतील प्रकरण अतिशय गंभीर आहे, एखाद्या टेक्निकल कंपनीमधे अशाप्रकारे गोष्टी घडणं धक्कादायक आहे. या सगळ्याचा तपास सखोल केला जाईल, सेही फडणवीसांनी सांगितले.
नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचाराचे प्रकरण उघड झाले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत. 5 आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन SITची (विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सर्व खासगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आणखी पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी 9123232311 तसेच कंट्रोल रूम 112 वर संपर्क करता येणार आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे.