राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता राज्यहिताच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान आता साखर उद्योगासाठी एक महत्वाची आणि दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे.
राज्यातील साखर कारखानदारीला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. एफआरपी वाढली, मात्र साखरेच्या विक्री दरात वाढ झाली नसल्याने कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर साखरेचा एमएसपी वाढविणे, इथेनॉलचे दर वाढविणे आणि सॉफ्ट लोन देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.
नवी दिल्ली येथे बुधवारी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हेही या बैठकीस उपस्थित होते.
दिल्लीतील बैठकीत साखर उद्योगासमोरील गंभीर आर्थिक अडचणींवर चर्चा झाली. साखरेचा किमान विक्री दर वाढवणे, इथेनॉलचे दर वाढवणे, सॉफ्ट लोन योजना सुरू करणे आणि कारखान्यांच्या कर्जांची पुनर्रचना करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांबाबत दहा दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.