नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) - व्यवसायवृद्धीसाठी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने महिलांना तीन ते चार कोटी रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही सिडको परिसरात राहते. आरोपी सई राजेंद्र बोडके, तिचा पती राजेंद्र बोडके (दोघे रा. विजयनगर, नाशिक, ह. मु. भुजबळ फार्मजवळ, नाशिक) व सई बोडकेचा मानलेला भाऊ विनोद दौंड यांनी संगनमत करून फिर्यादीला, तसेच इतर महिलांना व्यवसायवृद्धीसाठी ओम्साई बचत गटातून अरिहंत मायक्रो फायनान्स, चेन्नईतर्फे सुंदरआप्पा शेट्टी (रा. पार्थ व्हिला, समर्थ चौक, बालाजी ट्रस्ट, चेन्नई) यांच्यामार्फत व्यवसाय करण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये कर्ज मंजूर करून देते, असे आरोपी सई बोडके हिने फिर्यादी यांना सांगितले.
फिर्यादी या दि. 19 जून 2025 रोजी राणाप्रताप चौकात राहणारी चुलतनणंदेच्या घरी भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी नणंदेने फिर्यादीकडे सहा हजार रुपये मागितले. ते तिने दिले. त्यावर फिर्यादी म्हणाल्या, की तुला कशासाठी पैसे पाहिजेत? त्यावर नणंद म्हणाली, की सई बोडके हिच्याकडून व्यावसायिक कर्ज घेतले असून, ते मंजूर झाले आहे. त्याकरिता पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी, तिची नणंद शेजारीच राहणार्या महिलेच्या घरी गेल्या. तेथे पाच ते सहा बायका आधीच बसलेल्या होत्या. तेव्हा फिर्यादीची ओळख सई बोडके हिच्यासोबत करून दिली. यावेळी बोडके हिने या महिलांना सांगितले, की मायक्रोफायनान्स, चेन्नईतर्फे कर्ज मिळवून देण्याचे काम करतो. तुम्हाला कर्ज पाहिजे असेल, तर तुम्हालाही कर्ज मिळवून देते, असे सांगितले.
यावेळी फिर्यादीने व्यवसायासाठी एक कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर आरोपी बोडके हिने तीन बचत गटांमार्फत कमी व्याजदराने 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देते, असे आमिष दाखविले. हे कर्ज लवकर मंजूर करण्यासाठी कागदपत्रे तयार करावी लागतील. त्याकरिता 22 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावेळी फिर्यादीने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला 20 हजार रुपये दिले. त्यावेळी तेथे बसलेल्या बायकांपैकी एका महिलेचा फोन आला. सई मॅडम तुझ्याशी बोलणार आहेत, असे सांगून उषा पाटील यांच्या घरी यायला सांगितले.
तेव्हा तेथे सई बोडके म्हणाली, की नाशिकरोड येथे जाऊन कर्जाची कागदपत्रे तयार करण्यासाठी 22 हजार रुपये आहेत का, असे विचारले. तेव्हा फिर्यादीने फोन पे क्रमांकावरून 16 हजार रुपये दिले व उर्वरित चार हजार रुपये तेथे उपस्थित असलेल्या बायकांसमक्ष रोख स्वरूपात दिले.
दि. 21 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता सई बोडके हिने फिर्यादीला नाशिकरोड येथे बँकेत खाते उघडण्यासाठी जायचे असल्याचे सांगून एका महिलेच्या घरी यायला लावले.
त्यावेळी सई बोडके हिच्यासोबत आणखी दोन महिला असे सर्व जण नाशिकरोड येथे बँक ऑफ बडोदामध्ये गेले. त्यावेळी आरोपी सई बोडके हिने फिर्यादीकडे करंट अकाऊंट काढायचे आहे. त्याकरिता 22 हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने बोडके हिच्या अकाऊंटवर फोन पेद्वारे 22 हजार रुपये दिले. त्यानंतर अकाऊंट उघडले; मात्र फिर्यादीने अकाऊंट पाहिले असता त्यामध्ये केवळ दोन हजार रुपये शिल्लक दिसत होते. याबाबत विचारले असता “सर बघून घेतील. कर्जमंजुरीच्या वेळी तू टेन्शन घेऊ नकोस,” असे बोडके म्हणाली. दि. 22 जून रोजी आरोपी सई बोडके हिने फिर्यादीला एकटीलाच मंगलमूर्तीनगर येथे घरी बोलावून घेतले. बँकेतून कर्ज काढून देण्याच्या संदर्भाने अधिकार्यांना, कागदपत्रे तयार करण्यासाठी वकिलांना, जामीनदार, साक्षीदारांना पैसे द्यायचे आहेत. त्यासाठी आरोपीने पुन्हा 80 हजार रुपये मागितले. तेव्हा फिर्यादीने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला 50 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. दि. 23 जून 2025 रोजी उर्वरित राहिलेले 30 हजार रुपये फोन पे अकाऊंटवरून पाठविले. दि. 24 जून ते 3 ऑक्टोबर 2025 पावेतो 2 लाख 57 हजार 500 रुपये इतकी रक्कम बँकेतून कर्ज काढण्याच्या निमित्ताने दिली; मात्र त्यानंतर आरोपी बोडके हिने फिर्यादीकडे पुन्हा पैसे मागितले; मात्र फिर्यादीकडे पैसे नसल्याने तिने सोन्याचे दागिने अन्य महिलेच्या समक्ष तिच्या हातात दिले. त्यानंतर आरोपीने 40 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याबाबतचे पत्र फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर सेंड केले. या पत्रामध्ये अरिहंत मायक्रोफायनान्स, चेन्नई यांच्याकडून हे कर्ज मंजूर झाल्याचे म्हटले होते.
हे कर्ज घेण्यासाठी ओम्साई बचत गटामधील नऊ महिला आहेत. प्रत्येक महिलेस 40 लाख रुपये इतके कर्ज मंजूर झाले असून, ते मला मान्य आहे, वगैरेचा मजकूर पत्रामध्ये नमूद होता. नऊ महिलांपैकी एक महिला मयत झाली असून, तिच्या नावावर आलेले 40 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास सई बोडके हिने सांगितले होते. त्यावर फिर्यादीचा विश्वास बसला. अशा प्रकारे फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन फोन पेवरून 3 लाख 11 हजार रुपये व रोख स्वरूपात 15 लाख 42 हजार रुपये असे एकूण 18 लाख 53 हजार रुपयांची रक्कम व अंदाजे 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने फिर्यादीला कोणत्याही प्रकारचे लोन मंजूर करून न देता फिर्यादीकडून घेतलेले पैसे व दागिने परत न करता फसवणूक केली, तसेच फिर्यादीसह सई बोडके हिने फिर्यादीसह इतर महिलांनाही अरिहंत मायक्रोफायनान्स, चेन्नईतर्फे समीर नायर यांच्याकडून व्यवसायवृद्धीसाठी सात गटांमार्फत कर्ज काढून देते, असे सांगून त्यांच्याकडूनसुद्धा पैसे घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करून न देता त्यांची फसवणूक केली आहे. या महिलांची सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या सासूने आरोपी सई बोडके हिच्याकडे पैसे परत मागितले असता आरोपीचा पती राजेंद्र बोडके व मानलेला भाऊ विनोद दौंड यांनी “जा, आम्ही तुमचे पैसे व सोने देणार नाही,” असे बोलून फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दाम्पत्यासह तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागूल करीत आहेत.