महाराष्ट्राला चक्रावून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणी रोजच नवीन उलगडे होत आहे. यापूर्वीच खरातचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी, उद्योगपतींशी लागेबंध असल्याचे समोर आले आहे. सध्या अशोक खरातची एसआयटी चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवू शकतात अशी भीती आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. याबाबत रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.
रोहित पवार यांची एक्सवरील पोस्ट
खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत.
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत.
अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का?
असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय.
#सत्य_बाहेर_यायलाच_पाहिजे
#JusticeForTruth
#सत्य_लपणार_नाही