नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोंदू अशोक खरात याच्यावर काल गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केल्याची माहिती आहे. या प्रकरणी अशोक खरात याच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्याच्या बँक खात्यांची सखोल माहिती घेतली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर दुसर्याच दिवशी कारवाई झाली.
अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारकी व जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांसह मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहारही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाने शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. यामुळे खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. या प्रकरणामुळे खरातच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे.
या प्रकरणी त्याच्याविरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोणा यांसंदर्भात आहेत, तर उर्वरित 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. त्यात आता ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची भर पडली आहे. ईडीने प्रस्तुत प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ईसीआयआर दाखल केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.
बँक खात्यांची सखोल चौकशी सुरू
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून, खरातच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्याच्या बँक खात्यांची सखोल चौकशी केली जात आहे. तपासानंतर त्याच्या मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.