नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जेवणाचे बिल मागितल्याचा राग आल्याने 10 जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या कामगाराला पिस्तूल रोखत मारहाण केल्याची घटना सुला वाईन रोडवर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी संगम अरुण श्रीनाथ (वय 39, रा. नवीन सिडको) यांचे सुला वाईन रोडवर ईबिजाबिस्टो नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये 30 मार्च रोजी एम.एच.15 डी.एस.3444 या क्रमांकाच्या फोर्ड एन्डेवर कारमधून 6 जण तर विना नंबर प्लेटच्या दोन दुचाकींवर 4 जण असे एकूण 10 जण जेवणासाठी आले होते.
या टोळक्याने हॉटेलमध्ये पाहिजे त्या वस्तूची ऑर्डर केली. त्याचे बिल 8 हजार 193 रुपये झाले होते. हॉटेलचे बिल घेण्याकरीता कामगार हॉटेलच्याबाहेर या टोळक्याकडे गेला असता टोळक्यातील एकाने त्याच्याकडील बंदूक बाहेर काढत कामगारावर रोखली. नंतर या टोळक्याने हॉटेलमध्ये येऊन श्रीनाथ व त्यांच्या इतर कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केली.
नंतर एकाने श्रीनाथ यांचा टीशर्ट फाडून त्यांच्याकडे 16 हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी 10 जणांच्या टोळक्याविरुद्ध श्रीनाथ यांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहे.