नाशिक : टेंडरच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक; 'या' राजकीय पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : टेंडरच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक; 'या' राजकीय पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील भंगार उचलण्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला नऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी ’रयत स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थे’चे अध्यक्ष संशयित महेश भिकाजी बडवे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश आनंदराव पवार (वय 43, रा. शिवपुरी चौक, उत्तमनगर, सिडको) हे प्रॉपर्टी सेलर आणि बँक ’डीएसए’ एजंट म्हणून काम करतात. संशयित महेश बडवे याने पवार यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयातील पुढील तीन वर्षांचे भंगार (स्क्रॅप) उचलण्याचे व विक्री करण्याचे टेंडर मिळवून देतो, असे आमिष दाखवले.

या कामासाठी बडवे याने पवार यांच्याकडून 9 लाख रुपये घेतले. मात्र, बराच काळ उलटूनही टेंडर मिळाले नाही. पवार यांनी रकमेचा तगादा लावला असता, पैसेही परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. मंगेश पवार यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group