नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शहरासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी पूर्ण झाली.
नाशिकरोड न्यायालयाने या अर्जावरील निकाल राखून ठेवला असून, आता २ मे रोजी न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. त्यामुळे निदा खानवरील अटकेची टांगती तलवार तूर्तास कायम आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच दानिश ईजाज शेख आणि तौसिफ बिलाल अत्तार या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि आरोपींना चिथावणी देणारी निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तपासादरम्यान या गुन्ह्यात ॲट्रासिटीचे वाढीव कलम लावण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. फरार असलेल्या निदा खानने आपल्या वकिलामार्फत 'गरोदरपणाचे' कारण पुढे करत अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. निदा खानच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. तर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलिसांची बाजू मांडली आणि जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. सुनावणीच्या वेळी एसआयटी प्रमुख संदीप मिटके स्वतः हजर होते.
आता लक्ष २ मे कडे
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. निदा खानला दिलासा मिळणार की तिची रवानगी कोठडीत होणार, याचा फैसला आता येत्या २ मे रोजी होणार आहे. तोपर्यंत पोलिसांकडून तिचा शोध सुरूच राहणार आहे.