नाशिक रोड पोलीस लाईन परिसरात आग; लक्झरी बस थोडक्यात बचावली
नाशिक रोड पोलीस लाईन परिसरात आग; लक्झरी बस थोडक्यात बचावली
img
Chandrakant Barve



नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या मागील परिसरातील पोलीस लाईनमध्ये आज संध्याकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली.

या आगीत पालापाचोळ्यासह परिसरातील काही झाडे जळून खाक झाली. सुदैवाने जवळच उभी असलेली लक्झरी बस अग्नितून थोडक्यात बचावली.

सध्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्णतेची झळ जाणवत असतानाच सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस, नवीन न्यायालयासमोरील पोलीस लाईन व डिस्टिलरी वसाहत परिसरातील झाडाझुडपांना अचानक आग लागली. आग वेगाने पसरत असल्याने काही काळ परिसरात धुराचे लोट पसरले होते.

घटनेच्या काही अंतरावर एक लक्झरी बस उभी असल्याने मोठ्या अनर्थाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, नाशिक रोड येथील अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या एका बंबाच्या मदतीने आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला.

दरम्यान, या आगीमागे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जळता टायर
फेकल्याची चर्चा घटनास्थळी रंगत होती. अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group