नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विल्होळी परिसरात गेल्या सोमवारी सूरजकुमार सोलंकी नामक व्यक्तीवर लोखंडी कोयता व दगडाने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या दोघा पती-पत्नीस नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, ही मारहाण एका महिलेवर अनैतिक संबंधासाठी बळजबरी करण्याच्या प्रयत्नातून झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत माहिती अशी, की फिर्यादी सूरजकुमार मोहनलाल सोलंकी (जैन) (रा. अमरधाम रोड, नानावली, जुने नाशिक) यास विल्होळी शिवारात पती-पत्नीने मिळून लोखंडी कोयत्याचे वार करून व दगडाने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार पेठ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपासात एका महिलेशी सोलंकी यांचा वाद असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर आरोपीचा शोध घेतला असता हनुमंत अण्णासाहेब शिंदे (वय 42) व त्याची पत्नी साधना हनुमंत शिंदे (वय 37, दोघे रा. अंधापुरी, ता. पाथरी, जि. परभणी, हल्ली रा. विठाईनगर, नामको हॉस्पिटलच्या मागे, पेठ रोड, नाशिक) या जोडप्यास ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपासात या पती-पत्नीपैकी पत्नी साधना हिने दिलेल्या माहितीनुसार जखमी सूरज सोलंकी आणि साधना शिंदे यांची वाडीवर्हे येथे एका कंपनीत ओळख झाली. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. कालांतराने सूरज सोलंकी हा साधना हिला ब्लॅकमेल करून अनैतिक संबंधाची मागणी करू लागला. संबंध न ठेवल्यास तिच्यासह तिच्या परिवारास जिवे मारण्याची धमकी देऊ लागला.
या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपी पती हनुमंत शिंदे व त्याची पत्नी साधना शिंदे यांनी सोलंकी यास विल्होळी शिवारात बोलावले. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोलंकी याच्या हातावर, मानेवर व डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने व दगडाने वार करून मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
दोघा पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक व सहकारी करीत आहेत.
या यशस्वी तपासाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पेठचे उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांनी गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक आकाश भालेराव, शैलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप, हवालदार प्रवीण काकड, संदीप नागपुरे, रावसाहेब कांबळे, हेमंत गिलबिले, धनंजय शिलावट, प्रदीप बहिरम, संतोष दोंदे, किशोर बोडके, नितीन गांगुर्डे, महिला हवालदार ललिता शिरसाठ, अस्मिता मढवई, तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार गिरीश मराठे, शीतल गायकवाड, अनिल मुरडनर, प्रकाश वाजे, मंगेश पानझडे आदींचे अभिनंदन केले आहे.