
आजकाल प्रेमात फसवणूक करून दुसरीकडे लग्न करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत . दरम्यान , आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असतानाही एका तरुणाने ती गोष्ट लपवून दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे त्याला चांगलंच महागात पडलं आहे.
लग्नाच्या काही तास आधीच त्याच्या ‘खऱ्या’ प्रेयसीने एन्ट्री घेतल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. परिणामी नवरदेवाला लग्नाऐवजी पोलीस कोठडीचा सामना करावा लागला.
आरोपी सागर सतीश नेटके (रा. धानोरी) याने एका वधू-वर सूचक ग्रुपच्या माध्यमातून धानोरीतील एका २९ वर्षीय तरुणीशी ओळख वाढवली होती. आपण इंजिनिअर असल्याचे सांगून त्याने मुलीच्या कुटुंबीयांचा विश्वास जिंकला. १५ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला, ज्यासाठी मुलीच्या वडिलांनी २ लाख रुपये खर्च केले. लग्नाची तारीख १३ मे निश्चित झाली होती आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती.
सागरच्या घरी ११ मे रोजी हळदीचा कार्यक्रम रंगात आला होता. पाहुणे मंडळी जमली होती, गाणी वाजत होती. मात्र, त्याच वेळी सागरच्या 'जुन्या' प्रेयसीने तिथे एन्ट्री घेतली. तिने नवरीला थेट सांगितले की, "मी सागरची गर्लफ्रेंड आहे आणि तो तुझी फसवणूक करत आहे!" हे ऐकताच मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली.
अखेर पीडित तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नवरदेव सागर नेटके याच्यासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सागरला अटक केली असून, त्याचे लग्नाचे स्वप्न आता पोलीस कोठडीत विरले आहे.