बुद्धिबळ खेळात वयाच्या 18 व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवलेल्या नाशिकच्या विदित गुजराथीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. विदितनं आतापर्यंत बुद्धिबळ खेळात अनेक पदके पटकावली आहेत. त्याच बरोबर ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षापासून बुद्धीबळात चमक दाखवू लागलेल्या नाशिकच्या विदीत गुजराथी हा वयाच्या अठराव्या वर्षी २०१३ मध्येच भारताचा युवा ग्रॅन्डमास्टर बनला होता. तो खिताब पटकावल्यापासून अर्जुन पुरस्कारासाठी पात्र असलेल्या विदितला तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर का असेना अर्जुन पुरस्कारावर नाव कोरले गेले. त्याचा आनंद विदीतसह त्याच्या कुटुंबियांनादेखील झाला आहे.
विदीत २७०० चे एलो गुणांकन ओलांडणारा तो चौथा भारतीय खेळाडू असून बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये दुहेरी सुवर्णपदक विजेता आहे. तो आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक विजेता असून २०२३ मध्ये फिडे ग्रँड स्विस स्पर्धा जिंकली आणि कॅडिडेट्स स्पर्धेत पात्र ठरणारा तिसरा भारतीय बुद्धीबळपटू ठरला आहे. २०२४ च्या बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करीत देशाला सुवर्णपदक जिंकून देण्यात विदितचा मोलाचा वाटा होता. २०१७ मध्ये अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरल्यापासून २०२० पर्यंत नाव जाहीर झाले नव्हते. त्यानंतर २०२१ मध्ये अर्जुनचे निकष बदलल्याने सलग चार वर्ष दमदार कामगिरी करूनही पुरस्कारापासून वंचित विदितला अखेर २०२६ मध्ये न्याय मिळाला आहे.