राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली. ऑफिसमध्ये घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या शिवसेना नेत्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या हत्याकांडाच्या घटनेने ठाणे हादरले आहे.
मानपाडा परिसरात उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज मानपाडा परिसरातील तीन शाळा तसेच अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून वेगाने सुरू असून, पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
या प्रकरणात आणखी तीन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे. घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मानपाडा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.