नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध लागू
नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध लागू
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- नाशिक ग्रामीण जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी दि. २८ सप्टेंबर पर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात दिनांक २५ सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असून, सुमारे २ हजार ६०३ सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. गणेश मंडळांकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी, दि. २५ ते दि. २८ सप्टेंबर या कालावधीत विसर्जन मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगाने पोलिस ठाणे स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे व साऊंड सिस्टिम मालक तसेच चालक यांना मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करू नये, आवाजाची मर्यादा नियंत्रित ठेवावी, मिरवणुकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गणेश विसर्जन करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लेझर लाईटच्या वापरामुळे नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर पूर्णपणे टाळणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ (१) अन्वये नागरिकांच्या जीवितास अथवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तरतूद आहे. त्यानुसार दि. २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी गणेश मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजपूत यांनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group