राज्यातील हालचालींना वेग आला असून आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या जागांवरील निवडणुकीनंतर आता राज्यसभेच्या एकूण 12 जागांवर निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यात उत्तर प्रदेशातील एकूण 10 जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या 12 जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
उत्तराखंडच्या एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होईल. उत्तराखंडमधून भाजपचे नरेश बन्सल निवृत्त होणार आहे. या व्यक्तीरिक्त टीएमसी खासदार रुक्मिणी मलिक यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालच्या एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 11 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा 25 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यात भाजपच्या 8 खासदारांचा समावेश आहे. तर प्रत्येकी एक बहुजन समाज पार्टी आणि एक समाजवादी पार्टीच्या खासदाराचा समावेश आहे. भाजपचे नरेश बन्सल, बृजलाल, समी द्विवेदी, चंद्रप्रभात, हरदीप सिंह पुरी, नीरज शेखर, अरुण सिंह, बीएल वर्मा यांचा कार्यकाळ संपत आहे. समाजवादीचे राम गोपाल यादव आणि बसपाचे खासदार रामजी निवृत होत आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 28 जागांवर निवडणूक
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 29 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. यानंतर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हा 6 ऑक्टोबर रोजी असेल. उमेदवार 9 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असेल. निवडणुकीत 16 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदानाचा कार्यक्रम असेल. तर त्याच दिवशी मतमोजणी होईल.
तत्पूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोगाने चार राज्यातील 28 विधानपरिषदेच्या जागांवरही निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील 11 जागा, बिहारच्या 8, महाराष्ट्रातील 5, कर्नाटकातील 4 जागांचा समावेश आहे. अशा एकूण 28 जागांवर 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 पर्यंत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, संबंधित विभागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात कोणत्या पक्षाकडून कोणला कोणत्या जागेवर उमेदवारी मिळते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.