धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड; नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड; नेमकं प्रकरण काय?
img
Nandini khandare More
मुंबईतील  एका शाळेत पर्यूषण काळात डब्यात मेथीची भाजी आणल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याकडून ५० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.  भाईंदरमधील तपोवन विद्यालयात अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केल्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यूषण काळात तपोवन विद्यालयाने विद्यार्थ्यांना डब्यात मांसाहारी पदार्थांसह कांदा, लसूण, बीट आदी खाद्यपदार्थ आणण्यास मनाई केली होती. शाळेने या संदर्भात विद्यार्थ्यांना काही नियमही सांगितले होते. मात्र, एका विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शाळेने संबंधित विद्यार्थ्याकडून ५० रुपये दंड घेतल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्याच्या डब्यातील खाद्यपदार्थाबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्याला कॅन्टीनमधून दुसरा खाद्यपदार्थ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसेने याबाबत आक्षेप नोंदवत मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे दंड आकारण्याचा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारे घेण्यात आला, तसेच पर्यूषण काळातील खाद्यपदार्थांवरील निर्बंधांसंदर्भात शाळेने कोणते निर्देश दिले होते, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आहारासंदर्भात धार्मिक किंवा सांस्कृतिक नियम लागू करण्याचा अधिकार आणि त्याची मर्यादा यावरून हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाकडून शाळेच्या स्पष्टीकरणानंतर पुढील कारवाई केली जाते का, याकडे आता पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group