अहिल्यानगर - शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मंडळाचे अध्य दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गुलाल उधळण्यावरून पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. परंतू हा मृत्यू नेमका लाठीचार्जमुळे झाला की अन्य वैद्यकीय कारणांमुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि भिंगार पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यामुळे लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्येच दीपक वागसकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर गणपती मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत भिंगार बंद आणि गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या सर्व गोंधळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप घटनास्थळी आले असून ते देखील आक्रमक झाले आहेत.