बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक ग्राहकांनो लक्ष द्या कारण जर तुमचे बँकेचे काही कामे करायची असतील तर आजच करा कारण विविध बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसीय संप पुकारला आहे.
विविध बँक कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे या कालावधीत बँकांच्या नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस कर्मचारी संपावर जाणार असल्याने ग्राहकांनी आवश्यक असलेले बँकिंग व्यवहार संप सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करून घ्यावेत, असं आवाहन करण्यात येत आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर काही बँकांच्या शाखांच्या गेटवर ग्राहकांसाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. त्यामध्ये संपामुळे शाखेतील नियमित सेवा प्रभावित होऊ शकतात, याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, चेकशी संबंधित कामकाज, कागदपत्रे किंवा शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावयाचे इतर व्यवहार आहेत, त्यांनी त्याचं नियोजन आधीच करण्याची गरज आहे.
पाच दिवसांचा आठवडा करण्याची प्रमुख मागणी
बँक कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. त्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही प्रमुख मागणी असल्याची माहिती आहे. सध्या बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना काही शनिवारीही काम करावं लागतं. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा लागू करून शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टी द्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. याशिवाय कर्मचारी आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित इतर प्रलंबित प्रश्नांवरही तोडगा काढण्याची मागणी संघटनांनी केली आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनांनी तीन दिवसांचा संप जाहीर केला आहे.
ग्राहकांनी व्यवहारांचं नियोजन कसं करावं?
सलग तीन दिवस शाखांचं कामकाज प्रभावित होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नसली, तरी महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः ज्यांना शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून व्यवहार करणे आवश्यक आहे, त्यांनी 28 सप्टेंबरपूर्वीच संबंधित कामकाज पूर्ण करून घेणं योग्य ठरेल. दरम्यान, डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या अनेक व्यवहारांवर शाखा बंद असल्याचा थेट परिणाम होणार नाही. ग्राहकांना ATM, ग्राहक सेवा केंद्र, मोबाईल बँकिंग अॅप, UPI आणि डिजिटल बँकिंग सेवा वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ATM आणि UPI ठरणार पर्याय
रोख रकमेची गरज असल्यास ग्राहक ATMचा वापर करू शकतात. तसंच पैसे पाठवण्यासाठी UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र संपाच्या काळात काही तांत्रिक अडचणी किंवा सेवा व्यत्यय येण्याची शक्यता लक्षात घेऊन अत्यावश्यक व्यवहारांचं नियोजन आधीच करणं ग्राहकांसाठी सोयीचं ठरेल.