आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाचा यशस्वी बचाव केला आणि इतिहास रचला. जपानमध्ये सुरू असलेल्या आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. स्मृती मानधना आणि शफाली वर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात विक्रमी २१६ धावा करत श्रीलंकेसमोर तगडे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १५.४ षटकांत अवघ्या ६९ धावांवर आटोपला.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना शफाली वर्मा (४८), स्मृती मानधना (७९) आणि रिचा घोष (४९) यांच्या शानदार खेळींच्या जोरावर भारताने २१६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त मारा करत संपूर्ण श्रीलंकन संघाला अवघ्या ६९ धावांत गुंडाळलं.
२१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचे कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि इमेशा दुलानी यांनी डावाला सुरुवात केली.त्यांना पहिल्या विकेटसाठी केवळ १८ धावांची भर घालता आली. दुसरीकडे फलंदाजीमध्ये चमक दाखवल्यानंतर शफाली वर्माने गोलंदाजीमध्येही धुमाकूळ घातला आणि पॉवरप्लेमध्ये दोन बळी टिपले. तिने दुलानी (३) आणि हसिनी परेरा (०) यांना बाद केले.पॉवरप्ले संपल्यानंतरच्या लगेचच्या षटकात, दीप्ती शर्माने चमारी अथापथ्थूला झेलबाद करून श्रीलंकेला मोठा धक्का दिला.
अथापथ्थूने २१ चेंडूंत पाच चौकारांसह २१ धावा केल्या. त्यानंतरच्या षटकात श्रेयंका पाटीलने हर्षिता माधवीला शुन्य धावांवर बाद केले. ४९ धावांच्या धावसंख्येवर हन्सिमा करुणारत्ने (१) बाद झाल्यामुळे श्रीलंकेची पाचवी विकेट पडली. त्याच ४९ धावांच्या धावसंख्येवर श्रीलंकेची सहावी विकेटही गेली. दीप्ती शर्माने कविशा दिलहारीला (११) बाद केले.
सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले संपूर्ण श्रीलंकन संघ ६९ धावांत बाद झाला. भारतासाठी दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना १४७ धावांनी जिंकून भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला संघाचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.
स्मृती मानधना यांची ऐतिहासिक खेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय संघाने शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीच्या जोरावर शानदार सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. शेफाली अवघ्या दोन धावांनी अर्धशतक हुकली, तिने २९ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या.