भीषण अपघात ! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू
भीषण अपघात ! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू
img
Nandini khandare More

अलीकडे अपघाताच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून झारखंडमधील जमशेदपूर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. सोनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरीन ड्राइव्हवर हा अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रेलरच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कार ट्रेलरच्या मागच्या भागात अक्षरशः अडकली आणि कारचा चक्काचूर झाला. धक्कादायक म्हणजे या अपघातातील मृतांमध्ये झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीचा तृषा सिंहचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

एसडीओ अर्णव मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेलर हा बिघडला असल्यामुळे बुधवारी रात्री सुमारे १० वाजल्यापासून रस्त्यावर उभा होता. गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कार ट्रेलरच्या मागच्या बाजूला धडकली. या धडकेत कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच डीएसपी सीसीआर मनोज ठाकुर, सोनारी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय सुमन यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. कारची अवस्था अत्यंत खराब झाल्याने गॅस कटरच्या मदतीने वाहन कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group