बँक ग्राहकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप आता स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
संपाच्या केवळ एक दिवस आधी आयबीए आणि बँक कामगार संघटना, यूएफबीयू यांची रात्री उशिरा एक बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर संप स्थगित करण्यात आला असल्याची घोषणा करण्यात आली.
28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केली होती. मात्र, रविवारी रात्री उशिरा बँक कर्मचारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत होणारा तीन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सलग पाच दिवस बँका बंद राहू नये, ग्राहकांना संपाचा फटका बसू नये यासाठी रविवारी देखील बँका सुरु ठेवण्यात आल्या होत्या. सप्टेंबरमधील चौथ्या शनिवारमुळं बँकाक शनिवारी बंद होत्या. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी बँकाचं कामकाज सुरु ठेवण्यात आलं होतं.
पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यूनियनच्या नेत्यांच्या माहितीनुसार, मुख्य श्रम आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत सरकारकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यावर ठोस आश्वासन दिलं नाही. काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत लागू आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालयं, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, नाबार्ड या सारख्या इतर संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु आहे, असे बँक कर्मचारी युनियनं नमूद केलं आहे. पेन्शनच्या लाभातील सुधारणा, सर्व पेन्शनधारकांना एक समान महागाई भत्ता धोरण, एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्याव्यात या देखील बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.