गणेश विसर्जना नंतर एक मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे विजेची तार तुटून पडल्याने तब्बल 8 जणांना विजेचा धक्का बसला. यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील मंडाला जिल्ह्यातील हिरापूर गावात गणेश मंडपात एकूण आठ तरुण झोपले होते. झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास त्यांच्या अंगावर विजेचा तार तुटून पडला. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही तरुण जखमी झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शुक्रवारी रात्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून मंडळाचे सदस्य हिरापूर गावातील मंडपात परतले होते. विसर्जनामुळे थकवा आल्याने आठ तरुण मंडपातच जमिनीवर झोपले होते. परंतु शनिवारी पहाटे सुमारे 5 वाजता परिसरातील वीजपुरवठा सुरू झाला. त्याचवेळी वीजेच्या खांबावरील तार तुटून तो थेट मंडपात झोपलेल्या तरुणांच्या अंगावर पडला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तार तुटल्यामुळे शॉर्टसर्किट झाले असावे. त्यातच पावसामुळे परिसरात आणि जमिनीवर ओलावा असल्याने विजेचा प्रवाह अधिक धोकादायक ठरला. जमिनीवर झोपलेल्या तरुणांना विजेचा जोरदार धक्का बसला.
तार कोसळळ्यानंतर मंडपात एकच आरडाओरड सुरू झाली. या दुर्घटनेत जैनू भंवरे (19), रवि झरिया (24), कृष्णा कुमार भंवरे (18) आणि वीरेंद्र भंवरे (24) यांचा जागीच मृत्यू झाला. काही जणांनी प्रसंगावधान राखत तेथून बाजूला होऊन आपला जीव वाचवला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच एसडीएम आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून दुर्घटनेमागील नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. वीजपुरवठा आणि तांत्रिक बाबींचीही चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे हिरापूर गावात हळहळ व्यक्त होत असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.