दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे जवळपास ७५ टक्के महाराष्ट्रात दुष्काळ लागू होणार आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूरांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना लागू केल्या आहेत.दरम्यान आत राज्यातील हालचालींना वेग आला असून आदित्य ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राजकारण बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळात एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. ठाकरे यांनी सरकारवर दुष्काळ जाहीर करण्यास उशीर केल्याचा आरोप केला. कर्नाटकाने आपल्या आधीच दुष्काळ जाहीर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. केवळ शेतीच नव्हे, तर शहरी भागांवरही सुपर एल निनोचा परिणाम होणार असल्याने, व्यापक दृष्टिकोन ठेवून मदत करावी, असे ते म्हणाले. मदतीची रक्कम पारदर्शकपणे आणि वेळेत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे.
यासोबतच, कृषी पंपाच्या वीज बिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि कर्जमाफीऐवजी कर्जमुक्तीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नैराश्याची दखल घेऊन, सरकारने केवळ घोषणा न करता, प्रत्यक्ष कृती करावी, अशी त्यांची भूमिका आहे.