नाशिक (जिमाका):- मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भेळभत्त्यासोबत चटणीचे सेवन केल्यानंतर 186 ग्रामस्थांना जुलाब, उलटी व मळमळ याचा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. बाधित रुग्णांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, मालेगाव कॅम्प येथे दाखल करण्यात आले असून सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नांदगाव बुद्रुक येथे दि. 27 रोजी आठवडे बाजार भरला होता. या बाजारात पाटणे येथील एका विक्रेत्याकडून भेळभत्ता व तीन प्रकारच्या चटण्या विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या. बाजारात भेळभत्त्याचे सेवन केलेल्या ग्रामस्थांपैकी चटणीसह भेळभत्त्याचे सेवन करणार्या काही नागरिकांना काल जुलाब, उलटी व मळमळ याचा त्रास जाणवू लागला. चटणीशिवाय भेळभत्त्याचे सेवन करणार्या ग्रामस्थांना असा त्रास झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावाची अंदाजे लोकसंख्या 5 हजार 200 असून सुमारे 975 कुटुंबे आहेत. आरोग्य कर्मचार्यांनी केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात 186 ग्रामस्थांना संबंधित त्रास झाल्याचे आढळून आले. दाखल रुग्णांमध्ये नांदगाव बुद्रुक तसेच परिसरातील वाडी-वस्तीतील नागरिकांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार नांदगाव बुद्रुक येथील 52, भोरटे वस्ती (नांदगाव बुद्रुक) येथील 95, आनंदवाडी (नांदगाव बुद्रुक) येथील 26, गुंजाळवाडी (चिंचावड) येथील 9, वाके येथील 2 आणि सौंदाणे येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.
पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले
नांदगाव बुद्रुक तसेच भेळभत्ता विक्रेता राहत असलेल्या पाटणे येथील पाण्याचे नमुने यापूर्वीच जैविक तपासणीसाठी मालेगाव उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, सोमवार, दि. 28 सप्टेंबर रोजी पुन्हा पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नांदगाव बुद्रुक येथे आरोग्य विभागाचे पथक सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून दररोज परिस्थितीचा अहवाल घेण्यात येत आहे. तसेच गावातील साथरोग सर्वेक्षणासाठी स्वतंत्र पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार दूषित अन्नपदार्थ, विशेषतः चटणीसह भेळभत्त्याचे सेवन केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून आवश्यक ती खबरदारी व सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू आहे.