विधानपरिषदेसाठी महायुतीचा ‘फॉर्म्युला ठरला'; कोणत्या पक्षाला कोणती जागा?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा ‘फॉर्म्युला ठरला'; कोणत्या पक्षाला कोणती जागा?
img
Nandini khandare More
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याची माहिती समोर आली आहे. १७ जागांसाठी महायुतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ठराविक जागा देण्यात आल्या आहेत. या जागावाटपात नेमक्या कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा आल्या, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. विधानपरिषद जागेचा महायुतीचा अंतिम फॉर्मूला जवळपास निश्चित झाला आहे. पुणे शिक्षक जागेवर भाजप आणि शिवसेनामध्ये रस्सीखेच सुरू आहे. संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, नागपूर पदवीधर मतदारसंगाची जागा भाजपकडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी देखील माहिती समोर आली आहे की, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र जागावाटपावरून अद्याप एका जागेवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. त्यात पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात सध्या काँग्रेसचे जयंत आसगावकर आमदार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात असून महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या जागेवरून शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी गेल्या काही काळापासून शिक्षक संघटनांशी संपर्क वाढवत निवडणुकीची तयारी केली आहे. दुसरीकडे भाजपकडूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा नेमकी भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, यावर महायुतीतील चर्चांना वेग आला आहे.

पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुण्याची शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिंदेसेनेचे दोन नेते प्रचंड आग्रही असून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उदय सामंत यांचे निकटवर्तीय सानप आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे पुण्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. मात्र ही जागा भाजप दोघांनाही देणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे. तरीदेखील शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे. एकनाथ शिंदे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयी आज चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group