ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या प्रकरणी मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री ठाण्याच्या मानपाडा परिसरा प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करुन निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केला आहे.
पोलिसांनी मंगळवारी रात्रीच प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नऊ पथके तयार केली होती. ठाणे पोलिसांचा गुन्हे खंडणी विभागाने या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. गुन्हे खंडणी विभागाची 3 पथकं व इतर सहा पथकं अशी एकूण 9 पोलिसांची पथके आरोपींच्या मागवर असल्याची माहिती आहे. आरोपीचा शोध मुंबई व मुंबईबाहेरच्या परिसरात घेतला जात आहे. आतापर्यंत प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सगळे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येपूर्वी आरोपी पप्या शिंदे याच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या सगळ्यांच्या चौकशीतून आता पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्त्वाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्य सूत्रधारला अटक होत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही. ठाण्यात दडपशाही सुरु आहे. त्यांची दडपशाही किती दिवस चालेल? आपण उत्तर द्यायचं, अशा सूचना मातोक्षीवरुन उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. गद्दारी त्यांनी केली आहे त्यांच्याविरोधात आपण कायम उभे राहणार आहोत. आपण प्रदीप पूर्णेकर कुटुंबाच्या खंबीरपणे उभ राहायचे, असेही उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत सांगितले.
काल आदित्य ठाकरे, संजय राऊत, राजन विचारे यांच्यासह शिवसेनेचे नेते ठाण्यातील कापुरबावडी पोलीस ठाण्यात गेले होते. याठिकाणी हे सगळे नेते बराच काळ ठाण मांडून बसले होते. जोपर्यंत एफआयआरमध्ये शिंदे सेनेच्या मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे समाविष्ट करत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, असा पवित्रा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतला. सुरुवातीला पोलीस यासाठी तयार नव्हते. मात्र, आम्ही पोलीस ठाण्याबाहेर जमलेला जमाव घेऊन मिनाक्षी शिंदे यांच्या घराकडे जाऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर पोलिसांनी पुरवणी जबाबामध्ये मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे समाविष्ट केली. या सगळ्यामुळे ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण आहे.