यावर्षी राज्यात पावसाने पाठ फिरवली असून हवा तसा पाऊस पडलाच नाही. त्यामुळे राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे. हवामान खात्याच्या दाव्यानुसार, एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीवरही संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. याचदरम्यान आता हवामान विभागाने टेन्शन वाढविणारा अंदाज व्यक्त केला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस.डी. सानप यांनी याबाबतची माहिती दिली. एक दशकानंतर राज्यात या वर्षी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा राज्यातील पावसाची सरासरी तूट 18% आहे. राज्यातील सर्वच विभागात यावर्षी पावसाची कमी जास्त प्रमाणात तुट निर्माण झाली आहे. मात्र, येणाऱ्या 5 ते 6 दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची कमी शक्यता. असं असलं तरी राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच रब्बी हंगामात पेरणी करावी, असा सल्ला एस.डी. सानप यांनी दिला आहे.
सांगलीत विजांच्या कडकडाटासह पाऊस
दरम्यान, काल सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सांगलीत संध्यकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि पलूस तालुक्यातल्या अनेक भागात देखील जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. सायंकाळ नंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वाहनधारकांची चांगली तारांबळ उडाली, तर पावसा अभावी करपून चाललेल्या पिकांना देखील पावसाने जीवदान मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातही काल पावसाने दमदार एन्ट्री केली. तालुक्यातील काही भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचे लक्ष आता पावसाच्या पुढील स्थितीकडे लागले आहे. पावसाच्या दमदार एन्ट्रीमुळे परिसरातील वातावरणात बदल झाला होता.
कोल्हापूर शहराच्या काही भागात काल परतीच्या पावसाने हजेरी लावली. महिन्याभरानंतर शहरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने मोठा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने गेल्या काही दिवसापासून उकाड्यामुळे हैरान झालेल्या शहरवासीयांनी समाधान व्यक्त केलं.