''या'' भारतीय क्रिकेटपटूची फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
''या'' भारतीय क्रिकेटपटूची फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
img
Nandini khandare More
भारताच्या आघाडीच्या फिरकीपटूंपैकी एक असलेल्या युझवेंद्र चहलने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. चहलने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. तसेच आपण प्रथमश्रेणी क्रिकेटमधून तातडीने निवृत्त होत असलो तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत राहीन, असे चहलने स्पष्ट केले आहे. ३६ वर्षांच्या युझवेंद्र चहलने आपला शेवटचा प्रथमश्रेणी सामना लॉर्ड्सवर नॉर्थम्पटनशायर संघासाठी खेळला होता.

त्यानं आज, शुक्रवारी (२ ऑक्टोबर २०२६) फर्स्ट क्लास क्रिकेटमधून (प्रथम श्रेणी) निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून त्यानं ही माहिती दिली.

चहलनं फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं त्यानं स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून तो केवळ वनडे आणि टी २० क्रिकेट खेळला आहे. चहल गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काउंटी क्रिकेट खेळत होता. तो लॉर्ड्समध्ये नॉर्थम्प्टनशायर संघाकडून अखेरचा सामना खेळला आहे.

युजवेंद्र चहल यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. त्यानं सोशल मीडिया पोस्टमधून क्रिकेटची सुरुवात तर आतापर्यंतचा प्रवास यावर प्रकाशझोत टाकला आहे. मी पहिल्यांदा लाल चेंडू हातात घेऊन क्रिकेटची सुरुवात केली होती. त्यावेळी मी १० वर्षांचा होतो. मला क्रिकेटचं इतकं वेड लागेल याचा अंदाजही त्यावेळी नव्हता. याच फॉरमॅटमध्ये संयम, अडचणींचा सामना करण्याची हिंमत मिळाली. त्यामुळेच तासनतास मैदानावर ठाण मांडून प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेटसाठी संघर्ष करण्याचा आनंद घेता आला. मी अखेरचा फर्स्ट क्लास सामना लॉर्ड्समध्ये खेळलो. हे सांगताना थोडं भावुक होत आहे. कसोटी कॅप मिळवणं माझं नेहमीच स्वप्न राहिलं. मी बरीच वर्षे ते स्वप्न उराशी बाळगून होतो. भले ते स्वप्न माझं अपूर्ण राहिलं. पण माझ्या या प्रवासात मी समाधानी आहे. या फॉरमॅटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी मी आभारी आहे, असं चहलने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

वनडे, टी २० मध्ये कमबॅक करणारच! भारतीय संघातून बराच काळ बाहेर राहिलेल्या युजवेंद्र चहल यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी, आंतरराष्ट्रीय संघात जोरदार कमबॅक करण्याचा निर्धार त्यानं व्यक्त केला आहे. वनडे आणि टी २० संघात पुनरागमन करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देईल, असं त्यानं म्हटलंय. या प्रवासात सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यानं हरयाणा क्रिकेट संघ, रणबीर सिंह महिंद्रा सर आणि श्री अनिरुद्ध सिंह चौधरी यांचेही आभार मानले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group