ठाकरे गटाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर संपूर्ण राजकरणात एकच खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले असून आरोपींना अटक करण्याची आणि त्यांना फाशी देण्याची मागणी शिवसैनिकांकडून होत आहे. त्यामुळे ठाण्यातील वातावरण तापलं असून पोलिसांवरही दबाव वाढला आहे. पोलिसांनीही या हत्येची गंभीर दखल घेत आरोपींना पकडण्यास सुरुवात केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण नऊ पथके तयार केली होती. पोलिसाना या प्रकरणात आज मोठं यश आलं आहे. पोलिसांना चौथ्या आरोपीची ओळखही पटली आहे. मात्र, पाचव्या आरोपीने हेल्मेट घातले असल्याने त्याची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली असून नितेश पवार असे या चौथ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याप्रकरणात एकूण पाच आरोपी सहभागी होते. त्यातल्या एका आरोपीची ओळख पटणे अद्याप बाकी आहे. हत्या करताना हेलमेट घातल्याने पाचव्या आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. पप्पू शिंदे, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार अशी आतापर्यंत ओळख पटलेल्या आरोपींची नावे आहेत.
पप्पू शिंदे अटकेत असून अद्याप बाकीचे आरोपी फरार आहेत. आरोपी नितेश पवारने गुन्ह्यात भाच्याची गाडी वापरल्याचं तपासात समोर आलं आहे. सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पोलीस त्यांची आणखी माहिती घेत आहेत.
पोलिसांनी काल 2 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतलं होतं. ठाणे युनिट पाच येथे या चारही जणांची कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन महिलांची महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. या चौघांचा पूर्णेकर हत्याकांडात काय रोल आहे? याची माहिती पोलीस घेत आहेत.
दरम्यान मीरा रोड येथून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीरा रोडमधून 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. करिष्मा संतोष कनोजिया, रेणू अच्छेलाल मौर्य, सुनील कुसंता कनोजिया, रोशन रामबोध कैरी असं या पाचही संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण मानपाडा आणि मनोरमा नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली असून तपासात अनेक गोष्टी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. आतापर्यंत संतोष मेहिलाल कनोजिया याला पोलिसांनी अटक केली आहे.