बापरे ! सतत रडतंय म्हणून 22 दिवसांच्या बाळाला जन्मदात्या आईने थेट जमिनीवर फेकलं
बापरे ! सतत रडतंय म्हणून 22 दिवसांच्या बाळाला जन्मदात्या आईने थेट जमिनीवर फेकलं
img
Nandini khandare More

आजकाल आपल्याला विश्वास बसणार नाही अशा काही घटना ऐकायला येतात. आपल्या लेकराला साधी ठेच लागली तरीही  आईच्या जीवाची लाही लाही होते. पण एका आईने मात्र आईच्या नावाला काळिमा फासणार कृत्य केलं आहे. या आईनं अवघ्या २२ दिवसाच्या बाळाला रागाच्या भरात जमिनीवर फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. 



सतत रडत असल्याच्या रागातून एका 22 दिवसांच्या निष्पाप नवजात बालकाला त्याच्याच जन्मदात्या आईने थेट जमिनीवर फेकून दिले. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे ही धक्कादायक घटना आजीमुळे उघडकीस आली. या अमानुष कृत्यामुळे बाळाच्या उजव्या हाताचे मनगट आणि दंडाचे हाड फॅक्चर झाले आहे.

​विशेष म्हणजे, स्वतःच्या पोटच्या मुलीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याचे पाहून, संतापलेल्या आजीनेच (आईच्या आईने) आपल्या मुलीविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथील रहिवासी जयश्री हनुमंत दीक्षित वय 45 यांची मोठी मुलगी प्राची ही बाळंतपणासाठी आपल्या माहेरी आली होती. 22 एप्रिल रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. 6 मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून सर्व कुटुंबीय झोपले होते.

​7 मे रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हे 22 दिवसांचे नवजात बाळ अचानक मोठ्याने रडू लागले. मध्यरात्री बाळाचे रडणे थांबत नसल्याने आई प्राची दशरथ पंडित (वय 23) हिचा थरकाप उडाला आणि तिला तीव्र राग आला. रागाच्या भरात तिने कसलाही विचार न करता, त्या निष्पाप जीवाला हातावर घेतले आणि थेट जमिनीवर फेकून दिले.

प्राचीने केलेले हे धक्कादायक कृत्य तिची लहान बहीण संस्कृती हिने प्रत्यक्ष पाहिले. तिने तात्काळ हा प्रकार आई जयश्री यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून आजी जयश्री आणि संस्कृती यांनी तातडीने रडणाऱ्या बाळाला उपचारासाठी टेंभुर्णी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

बाळाला गंभीर दुखापत झाल्याचे समजताच जयश्री दीक्षित यांनी तात्काळ आपले जावई (प्राचीचे पती) दशरथ पंडित यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली आणि पिंपळनेर येथे बोलावून घेतले. स्वतःच्या पोटच्या मुलाला गंभीर दुखापत करून क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या प्राची पंडित हिच्या कृत्याला पाठीशी न घालता, अखेर तिची आई जयश्री दीक्षित यांनी स्वतः कुर्डुवाडी पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.

​या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांनी आई प्राची दशरथ पंडित हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण माढा तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group