राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेतील उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसभापती पदाच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील विधान परिषदेत उपस्थित होते.
विधान परिषदेतील उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधान परिषदेतील आकडेवारी पाहता महायुतीचे एकतर्फी विजय झाला असता. परंतु तरी देखील मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना दाखल केलेला उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा आहे की सर्वानुमते निवड व्हावी. त्यामुळे उमेदवारीचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती झाली.