धक्कादायक  : माझ्या अंगात देव येतो... असं सांगत नरबळीचा सल्ला; कुठे घडला प्रकार ?
धक्कादायक : माझ्या अंगात देव येतो... असं सांगत नरबळीचा सल्ला; कुठे घडला प्रकार ?
img
Nandini khandare More


अंधश्रद्धा, भोंदूगिरी, जादूटोणा करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान आता असाच एका अतिशय धक्कादायक प्रकार सांगलीतून उघडकीस आला आहे. एका भोंदूने चक्क देव अंगात येत असल्याचं सांगून नरबळी देण्याचा सल्ला दिला असल्याचा अत्यंत  गंभीर प्रकार घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , आरोपींनी  देव अंगात येतो  तसेच  छत्रपती शिवाजी महाराज अंगात येतात असे नाटक रचून कुटुंबीयांना वर्षानुवर्षे मानसिक छळ केला. या प्रकरणी अखेर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांचे विशेष योगदान महत्त्वाचे ठरले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवें यांनी सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्क साधत, पुरावे गोळा केले आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे प्रकरणाला वेग आला आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तक्रारदार कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आरोपी भोंदू महाराज संकेत निकम, महेश बाबर आणि सूरज उपाध्याय यांनी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत कुटुंबाला वारंवार भीती दाखवली. तुमचा नवरा मरेल, मुलगी मरेल, वाईट शक्तींचा प्रभाव आहे, नरबळी दिल्याशिवाय संकट टळणार नाही, अशा भयावह विधानांद्वारे त्यांनी कुटुंबाकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली आहे.

देव अंगात येतो , छत्रपती शिवाजी महाराज अंगात येतात असे नाटक करून पती-पत्नीवर मानसिक दबाव टाकत , भीती दाखवत आणि आरोपी बुक्क्याने पीडितास मारहाण करत असे. पीडित कुटुंबाने यापूर्वीच विटा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, मात्र त्यावेळी गंभीर दखल घेण्यात आली नव्हती. नंतर प्रकरण अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गेल्यावर समितीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवें आणि अंनिस यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे , पुरावे संकलित करून आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचीही गंभीर माहिती समोर आली आहे. ती मुलगी तक्रार नोंदवण्यासाठी विटा पोलिस स्टेशनमध्ये गेली होती, मात्र तेव्हा तिला चक्कर आल्याने गुन्हा नोंद झाला नव्हता. लवकरच या प्रकरणातही स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या भोंदूगिरीमुळे विटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group