राज्यातील महिला अत्याचारच्या घटनांनमध्ये सध्या चिंताजनक वाढ होत आहे. हि बाब अतिशय गंभीर असून महिला सुरक्षित नसल्याचं समोर येतंय. गेल्या काही दिवसांआधीच पुण्यात नरसापूर येथे एका वृद्ध नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आसल्याची संतापजनक घटना घडली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा पुण्यातून एक बातमी समोर य्येत आहे.
पुण्यातील पब संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव पार्क परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका महिलेवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. मध्यरात्री हॉटेलमधील पार्टी केल्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने महिलेवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पार्टीसाठी आली होती. याच पार्टीदरम्यान तिची ओळख एका पुरुषाशी झाली. पार्टी संपल्यानंतर रात्री उशिरा हॉटेलबाहेर पडताना, संबंधित पुरुषाने महिलेला तिच्या घरी सुरक्षित सोडतो असं सांगून विश्वासात घेतलं आणि तिला आपल्या कारमध्ये बसवले. मात्र, मुंढवा ते कोरेगाव पार्क रस्त्यावरून कार जात असताना, आरोपीनं गाडीतच महिलेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि चालत्या कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडित महिला आणि आरोपी पुरुष यांची आधीपासून कोणतीही ओळख नव्हती. काही तासांपूर्वीच हॉटेलमधील पार्टीत त्यांची तोंडओळख झाली होती. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कारमध्ये बसणं महिलेला महागात पडलं. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
कोरेगाव पार्क पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या हॉटेल परिसरातील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. एका महिलेवर अशाप्रकारे धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.