गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून आता बीड मधून थरारक हत्येची घटना समोर आली आहे. बीडमधील शिरूर तालुक्यातील पाडळी या गावामध्ये गायरान जमिनीच्या वादातून एका तरुण शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शंकर बर्डे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे पाडळी गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी गावातील गायरान जमिनीवरून शंकर बर्डे आणि काही लोकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादाचे पर्यावसान शुक्रवारी रक्तरंजित घटनेत झाले. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून शंकर बर्डे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शंकर यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वीच बर्डे यांनी आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र त्यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मृत शंकर बर्डे यांनी अवघ्या ५ ते ६ दिवसांपूर्वीच शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या जीविताला धोका असल्याची लेखी तक्रार दिली होती. आपल्याला मारहाण किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.