''या'' राज्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी ! कुठे मुसळधार तर कुठे उष्णता ?
''या'' राज्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी ! कुठे मुसळधार तर कुठे उष्णता ?
img
Nandini khandare More

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून आता राज्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे.  काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णता असं सध्याच चित्र आहे. दरम्यान आता विविध राज्यांसाठी  हवामान विभागाकडून अलर्ट जारी काण्यात आला आहे. सविस्तर परिस्थितीचा आढावा खालीलप्रमाणे

दिल्ली आणि मुंबईत कसे असेल हवामान?
दिल्लीमध्ये पुढील तीन दिवस संमिश्र हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळी काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. तसेच शहराच्या काही भागात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीसाठी 2 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन ते चार दिवसांत परिस्थिती आणखी अनुकूल होईल आणि मान्सून लवकरच उत्तर अरबी समुद्र आणि गुजरातच्या उर्वरित भागात पोहोचेल. त्याचबरोबर तो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उर्वरित भागातही तो पूर्णपणे सक्रिय होईल. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांतही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या भागात मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात उष्णतेचा कहर
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. पूर्व उत्तर प्रदेशात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ओडिशामध्येही उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. कडक ऊन आणि गरम वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ईशान्य भारतात हवामान अत्यंत खराब राहणार आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 27 ते 29 जूनदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. आसाम आणि मेघालयमध्येही परिस्थिती गंभीर बनली आहे, आगामी आठवडाभर या राज्यांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने तामिळनाडूतील 15 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. निलगिरी आणि कोयंबतूरसारख्या डोंगराळ जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागपट्टिनम आणि तूतीकोरिन किनारपट्टीवरील मच्छिमारांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group