केतन अग्रवाल प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात अनेक धक्कदायक खुलासे होत आहेत . तसेच, या प्रकरणाचे अनेक धागे दोरे सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणाचत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आज केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. याबाबत सीएमओकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.
‘लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले. या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.’ असं ट्विट महाराष्ट्र सीएमोच्या वतीनं करण्यात आलं आहे.