टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली असून आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही 28 जून रोजी घेण्यात येणार होती. दरम्यान आता या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
टिईटी पेपरफुटी प्रकरणावर परिक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे म्हणाल्या की,” परीक्षा परिषदेच्या पेपर फुटी नंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही. पुर्ननोंदणी करण्याची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. परीक्षा परिषद पुणे आयोजित परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीग झाल्याची माहिती समोर आली. 37 ठिकाणी परीक्षा होणार होती. 1728 परीक्षा केंद्र होते. सहा लाख 125 उमेदवार परीक्षा देणार होते. पेपर फुटी नंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे याचं नियोजन लवकर कळवू. सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही. यामध्ये उमेदवारांचा दोष नाही. पुन्हा रजिस्ट्रेशन फी आकारणार नाही.”
शिक्षण तज्ञ तथा अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नीट पाठोपाठ आता TET चा पेपर फुटला. माध्यमांनी बातम्या शोधायच्या आणि तज्ञांनी मत मांडायची. समाजाने वैतागायच आणि सरकारने चौकशीची भाषा बोलायची आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा हे किती चालणार. यामुळे विद्यार्थांचा परीक्षेवरचा विश्वास उडतोय हा गंभीर प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षा हे एकच माध्यम तरुणांसाठी उपलब्ध आहे आणि कितीही घटना घडल्या तरी जबाबदारी निश्चित होत नाही. इतके आंदोलन होऊन केंद्रीय शिक्षणमंत्री अजून राजीनामा देत नाही. केवळ रेल्वे अपघात झाला तर लालबहादुर शास्त्रींनी राजीनामा दिला होता त्यामुळे प्रतिक्रिया न देणे हीच मोठी प्रतिक्रिया ठेवावी अस माझं मत आहे.