चूलत भावाच्या लग्नात डीजेवर नाचली,  नवऱ्याला राग अनावर , पुढे घडलं भयानक ..
चूलत भावाच्या लग्नात डीजेवर नाचली, नवऱ्याला राग अनावर , पुढे घडलं भयानक ..
img
Nandini khandare More


गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. पती पत्नीच्या किरकोळ वादातून अनेक घटना घडत असून  आता नांदेड जिल्ह्यातून अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे.चुलत भावाच्या लग्नात डीजेवर नाचल्याच्या कारणावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःदेखील टोकाचे पाऊल उचलले. 

भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथील रहिवासी असलेले विनोद रंगराव राठोड (४०) आणि त्यांची पत्नी पायल विनोद राठोड (२७) हे एका लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते. १० मे रोजी लग्नादरम्यान पायल यांनी डीजेवर डान्स केला होता, जो विनोद यांना आवडला नाही. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर पायल आपल्या मुलांसह माहेरी (बोरगडी तांडा) निघून गेल्या होत्या. मात्र, विनोद यांच्या मनातील राग शांत झाला नव्हता. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास विनोद यांनी झोपेत असलेल्या पायल यांचा चाकूने गळा चिरून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर त्यांनी गावाच्या शिवारात जाऊन एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, या भीषण हत्याकांड आणि आत्महत्येमुळे राठोड कुटुंबातील दोन मुली आणि एका आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे छत्र हरपले आहे. आई-वडिलांच्या या टोकाच्या निर्णयामुळे ही तीन निष्पाप मुले आता पोरकी झाली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सकाळी पायल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शोध घेतला असता विनोद यांचाही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. हिमायतनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group