नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- आई-वडिलांच्या मृत्यूला करणी, भूतप्रेत कारणीभूत असून, गुप्तधन, शापित जमीन व अघोरी शक्तीचा आधार घेत दोन भावांमध्ये अंधविश्वास निर्माण करुन पुजेसाठी दीड लाख रुपये तसेच अंधश्रद्धेची भिती दाखवून त्यांची 2 एकर जमीन बीक्षसपत्राद्वारे बळकावणार्या दाम्पत्याविरुद्ध भोंदूगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी कमलेश उर्फ शिवकुमार अधिकारी, गौरी कमलेश अधिकारी (दोघेही रा. सप्तशृंगी चरण अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी फिर्यादी मदन नवनाथ देवकर (रा. लऊळ, ता. माढा, जि. सोलापूर) याचा भाऊ ज्ञानेश्वर नवनाथ देवकर याची सप्टेंबर 2023 मध्ये भेट घेऊन त्याच्याशी अधिकारी दाम्पत्याने परिचय करुन घेतला. या दाम्पत्याने फिर्यादीच्या आई-वडिलांचा मृत्यू हा करणी आणि भूतप्रेताच्या शापातून झाल्याचे फिर्यादीला सांगितले.
त्यानंतर गुप्तधन, शापित जमीन व अघोरी शक्तींचा आधार घेऊन दोन्ही भावांमध्ये या दाम्पत्याने अंधविश्वास निर्माण केला. अधिकारी दाम्पत्याने फिर्यादीकडून अघोरी पूजा, होमहवन, गुप्तधन काढणे व फिर्यादीच्या कुटुंबावरील शाप दूर करणे या कारणांसाठी फिर्यादीकडून फोन पे द्वारे 90 हजार व 60 हजार रूपये रोख असे एकूण दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर उज्जेन, पिंपरखेड, पेगलवाडी फाटा व इतर ठिकाणी अघोरी पूजा करून बकर्या व बोकडांचे बळी दिले. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये जाऊन अघोरी विधी करुन अधिकारी दाम्पत्याने फिर्यादी व फिर्यादीच्या भावावर मानसिक प्रभाव निर्माण केला.
फिर्यादीच्या भावाकडून आरोपींनी आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे घेऊन अंध:श्रद्धेची भीती घालून मानसिक प्रभाव व खोट्या आश्वासनाच्या प्रभावाखाली आणि दबावाखाली दोन्ही भावांना रजिस्ट्रार कार्यालयात नेऊन तेथे कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या. या दोन्ही भावांकडून महादेवी ज्ञानविद्या ट्रस्टच्या नावावर मौजे लऊळ शिवारातील 2 एकर शेती अंधश्रद्धेची भिती घालून बळजबरीने बक्षीसपत्र करून घेतले. ही जमीन बक्षीसपत्राद्वारे मिळवल्यानंतर आरोपींनी देवकर बंधूंना त्र्यंबकराज आश्रमात ताब्यात ठेऊन त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले. त्यानंतर फिर्यादी व त्याच्या भावाला विविध मठांमध्ये ठेऊन त्यांच्याशी काही काळ संपर्क तोडला.
तसेच फिर्यादीवर पाळत ठेऊन त्यांना आश्रमाबाहेर जाऊ देण्यास मज्जाव केला. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यापासून परावृत्त केले. त्याचप्रमाणे अधिकारी दाम्पत्याने या दोन्ही भावांवर मानसिक दबाव टाकून त्यांना त्रास दिला. दरम्यानच्या काळात कमलेश महाराज याने देवकर यांच्यावर लिंबू उतरवून कापले व वेताच्या काठीने अंगावर फटके मारुन सात धान्य अंगावर फेकून भूताची बाधा काढत असल्याचे सांगून ते जे सांगतील ते खरे आहे असे बिंबवून त्यांच्या मनात अंधविश्वास निर्माण केला.
याबाबतचा तक्रार अर्ज फिर्यादींनी कोर्टात दाखल केला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशान्वये हा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहे.