गुन्हेगारी इतक्या जास्त प्रमाणात वाढत आहेत कि आता याला आळा घालणे कठीण झाले आहे. अतिशय किरकोळ वादातून सुद्धा हत्येसारख्या गंभीर घटना घडत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, कल्याणमधून एक भयंकर प्रकार पुढे आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मोबाईलवर लुडो गेम खेळण्यावरून मामा-भाच्यात बिनसलं. रागाच्या भरात अल्पवयीन मामाने भाच्याची गळा चिरून हत्या केली. उंबर्डे कोळीवली परिसरातील या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांनी अल्पवयीन मामाला ताब्यात घेतलंय.
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे- कोळीवली परिसरात रॉयल ढाबा असून तिथे मामा-भाचे काम करतात. भाचा गोखील भीम बहादूर हा मामा चित्रा बहाद्दूर याच्याकडेच राहात होता. घरी आल्यानंतर त्यांचा लुडो गेम खेळण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अल्पवयीन मामानं भाचा गोखील याला संपवण्याचा प्लॅन केला. रात्री सगळेजण गाढ झोपेत होते. तेव्हा अल्पवयीन मामा उठला आणि भाजी कापण्याची सुरी घेऊन झोपलेल्या गोखीलचा गळा चिरला. या हल्ल्यात भाच्याचा जागीच मृत्यू झाला.
गोखीलला लुडो गेमचा नाद होता. तो सतत गेम खेळत बसायचा. त्याचं कामाकडे दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळे मामाला याची चीड होती. त्यामुळे त्यांच्यात सतत किरकोळ वाद व्हायचे. लुडो खेळणं बंद कर असं मामा सतत सांगायचा. तर लुडो गेम म्हणजे व्यसन नाही, अशा शब्दांत भाचा मामाला समजावण्याचा प्रयत्न करायचा. मात्र हा वाद टोकाला गेला आणि भाच्याचा बळी गेला
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामा अल्पवयीन आहे. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले असून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. मोबाईल गेमच्या नादात राग अनावर झाला. क्षुल्लक कारणावरून मामानेच रक्ताच्या नात्याचा बळी दिल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.