प्रेमसंबंध आणि दुसरे लग्न...  पतीला थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलले
प्रेमसंबंध आणि दुसरे लग्न... पतीला थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलले
img
Nandini khandare More
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून दरदिवशी अनेक धक्कादायक घटना घडत आहे. त्याचप्रमाणे सध्या विवाहबाह्य संबध आणि त्यातूं होणाऱ्या वादांच्या घटनाही आता वाढतच चालल्या आहेत . दरम्यान, आता अशीच एक धक्कदायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून  समोर आली आहे. 



सोशल मीडियावरून झालेली ओळख, त्यानंतरचे प्रेमसंबंध आणि दुसरे लग्न... मात्र याच नात्यात पैशांचा आणि दागिन्यांचा वाद इतका विकोपाला गेला की पत्नीने संतापाच्या भरात पतीला थेट दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली ढकलले. शहरातील पुंडलिकनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत संदीप धुम्मा राठोड (वय 34, रा. वाळूज महानगर, मूळ रा. आडगाव चिंचोली) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पत्नी प्रियांका रोहिदास पवार हिच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा काळे या करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप राठोड हे त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख प्रियांका पवार हिच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर 2024 मध्ये त्यांनी एएस क्लब परिसरातील एका फ्लॅटमध्ये प्रियांकासोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर संदीप हे प्रियांकाच्या राहणीमानाचा खर्च, फ्लॅटचे भाडे तसेच इतर खर्च उचलत होते. डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी प्रियांका आणि तिच्या मुलासाठी विशालनगर भागात दरमहा 17 हजार रुपये भाड्याने नवीन फ्लॅटही घेऊन दिला होता.

9 मे रोजी संध्याकाळी संदीप हे विशालनगर येथील फ्लॅटवर गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रियांकाला किराणा साहित्य आणि काही पैसे दिल्यानंतर मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मे रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास ते पुन्हा फ्लॅटवर परतले. घरी आल्यानंतर त्यांनी प्रियांकाकडे जेवण मागितले. मात्र, तिने जेवण देण्यास स्पष्ट नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

वाद सुरू असतानाच प्रियांकाने तिच्या आईला देण्यासाठी संदीप यांच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यावर संदीप यांनी, “तुझ्याकडे असलेल्या माझ्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे पावणेतीन तोळ्यांचे ब्रेसलेट आधी परत कर, त्यानंतरच पैसे देतो,” असे सांगितले. या उत्तरामुळे प्रियांका संतापली आणि दोघांमधील भांडण अधिकच वाढले. अखेर पहाटे 2 वाजेच्या सुमारास गॅलरीत उभ्या असलेल्या संदीप यांना प्रियांकाने पाठीमागून जोराचा धक्का दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group