नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी आरशील साबीर मन्सुरी (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक याने फिर्यादी पीडितेशी सलगी करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला सन 2022 ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सातपूर येथे हॉटेल डेमोक्रसी येथे नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डवर ठेवले, तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील सोन्याची चेन व कानातील दागिने आरोपी अरशील मन्सुरी याने जबरदस्तीने काढून घेऊन स्वत:कडे ठेवून घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अरशील मन्सुरीसह त्याला मदत करणार्या दीपक, हिमांशु, दिनेश व प्रथमेश या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडे करीत आहेत.
तर दुसरीकडे सातपूर परिसरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय . लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देऊन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी श्रेयस ऊर्फ राज नीलेश दिघे (वय 21, रा. लाल चौक, मु. पो. ता. सिन्नर) याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पीडितेशी वारंवार गोड बोलून तिला सातपूरच्या फाशीच्या डोंगराजवळ असलेल्या एका लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने दिघे याला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नास नकार देऊन पीडितेला मारहाण केली. हा प्रकार सप्टेंबर 2025 ते दि. 16 मार्च 2026 या कालावधीत घडला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात श्रेयस दिघेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.