नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या तरुणीने आयुष्य संपवलं आहे. पोलीस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने तरुणी नैराश्यात होती आणि याच कारणातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (वय 20) असे या मृत तरुणीचे नाव असून, तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी मोठी मेहनत घेत होती. शनिवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घरातील सदस्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घोटी पोलिसांना पाचारण केले. या प्रकरणी योगेश्वर विष्णू सुरुडे यांनी पोलिसांना प्राथमिक माहिती दिली.
नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेचा निकाल प्रतीक्षासाठी धक्कादायक ठरला. या भरतीचे मेरिट 127 गुणांवर बंद झाले होते, तर प्रतीक्षाला 125 गुण मिळाले होते. अवघ्या दोन गुणांनी वर्दीचे स्वप्न भंगल्याने प्रतीक्षा प्रचंड मानसिक दबावाखाली आणि नैराश्यात होती. ही दोन गुणांची तफावत ती सहन करू शकली नाही आणि याच नैराश्यातून तिने आपले आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.