महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरातची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला आज (सोमवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातच्या तिसऱ्या गुन्ह्यात सात दिवसांची म्हणजेच २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर आता चौथ्या गुन्ह्यात देखील त्याची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला आज ऑनलाइन पद्धतीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी खरातचे नाव विचारले आणि पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर खरातने 'नाही' असे उत्तर दिले. यावेळी सरकारी वकील आणि आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात उपस्थित होते.
तिसऱ्या गुन्ह्यातील तपासासाठी खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती, ज्याची मुदत आज संपली. एसआयटीने आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील न्यायालयात सादर केला. सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली आहे.
खरातचे वकील चौथ्या गुन्ह्यासाठी 'वकीलपत्र' घेणार आहेत. न्यायालयाने खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी आता एसआयटी चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेऊन पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर आरोपी तुरंगात जाईल, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्याचा ताबा घेण्याचा सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या. तर अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.