नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या कंपनीच्या एचआर निदा खान अद्याप फरार आहे. तिचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, आता ज्या नाशिकमधील आयटी कंपनीत अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला होता. त्या कंपनीनं आपलं कामकाज थांबवलं आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीत उपस्थित न राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी नाशिकच्या आयटी कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाडाझडती घेण्यात आली आहे. या कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून Work From Home करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली टीमकडून झाडाझडती घेतली असून कंपनीत सुरू असलेल्या काळ्या कारनाम्यांची चौकशी करण्यात आली आहेत. एवढंच नव्हे तर नाशिक युनिटमधील नवीन भरती प्रक्रिया देखील थांबवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत येथील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची (NCW) टीम 18 एप्रिल रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. ही टीम पीडित महिलांशी संवाद साधून प्रकरणाची सविस्तर पाहणी करणार आहे.
मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे, ज्यात कंपनीची HR अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. अश्विनीच्या चौकशीतूनच निदा खानच्या मुख्य भूमिकेचा खुलासा झाला आहे. निदा खानच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.